धाराशिव:= शहरात ‘केंद्रीय विद्यालय’ स्थापन करण्याच्या प्रक्रियेवरून आता श्रेयवादाची लढाई शिगेला पोहोचली आहे. शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी केलेल्या टीकेला आता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. “खासदार ओमराजे निंबाळकर यांना मागील ७ वर्षांत केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न मार्गी लावणे अजिबात जमले नाही. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याची सवय असलेले खासदार आणि त्यांच्या अज्ञानी कार्यकर्त्याने पत्रकबाजी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे,” असा घणाघात राहुल काकडे यांनी केला आहे.
केंद्रीय विद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाच्या तारखेवरून आणि जागेच्या उपलब्धतेवरून राहुल काकडे यांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर आणि सोमनाथ गुरव यांच्यावर निशाणा साधला आहे.
काकडे यांचे दावे:
-
पथक २२ नव्हे, २० जुलैला येणार:
सर्वांत मोठा दावा करत काकडे यांनी सांगितले की, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (KVS) पथकाने पाहणी दौऱ्यात बदल केला होता. २२ जुलै रोजी कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे कार्यक्रम असल्यामुळे, दौऱ्याची तारीख २२ ऐवजी २० जुलै अशी निश्चित करण्यात आली होती आणि प्रशासनाला तसे कळवले होते. “याची माहिती नसलेले खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्याने जुन्या माहितीच्या आधारावर पत्रक काढून स्वतःची उरलीसुरली अब्रू चव्हाट्यावर आणली आहे,” अशी टीका काकडे यांनी केली.
-
आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून जागेची निश्चिती:
केवळ आरडाओरडा करून प्रश्न मार्गी लागत नसतात, असे सांगत काकडे यांनी आमदार पाटील यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली:
-
तात्पुरती जागा: जिल्हा परिषदेच्या नवीन बॉडीने आमदार पाटील यांच्या सूचनेनुसार डीआयसी रोडवरील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोरील जिल्हा परिषद शाळेची प्रशस्त इमारत तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
कायमस्वरूपी जागा: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागील ५ एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा प्रस्ताव आमदार पाटील यांनी प्रशासनाकडून तयार करून शासनाकडे पाठवला आहे. याच जागांची पाहणी करण्यासाठी पथक येत आहे.
-
-
२०२२ च्या लोकसभेतील प्रश्नावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह: सोमनाथ गुरव यांनी दाखला दिलेल्या २०२२ च्या लोकसभेतील प्रश्नाबाबत बोलताना काकडे म्हणाले की, “त्या प्रश्नात धाराशिवचा उल्लेखच नाही. तसेच, केंद्रीय विद्यालय हे राज्य, जिल्हा किंवा आकांक्षित जिल्हा या निकषावर सुरू केले जात नाहीत, असे त्या प्रश्नाच्या उत्तरातच स्पष्ट म्हटले आहे.” लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पथक एखाद्या जिल्ह्यात जात नसते, याचेही ज्ञान गुरव यांना नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
“मार्च २०२५ च्या बैठकीतील निर्णय जनतेसमोर मांडा”
गुरव यांनी उल्लेख केलेल्या मार्च २०२५ मधील प्रशासकीय बैठकीलाही काकडे यांनी आव्हान दिले आहे. “त्या बैठकीत जागेविषयी नेमका काय निर्णय झाला, हे गुरव यांनी सोयीस्करपणे लपवले आहे. त्यांनी तो निर्णय एकदा जिल्हावासीयांना सांगून टाकावा. फक्त ‘जागा द्या’ असे ओरडल्याने विद्यालय मंजूर होत नसते, त्यासाठी प्रशासकीय बाबींची पूर्तता आणि दूरदृष्टी लागते,” असे काकडे यांनी स्पष्ट केले.
“नगरपरिषद निवडणुकीत जनतेने तिसऱ्या नंबरवर ढकलले”
राजकीय हल्लाबोल करताना राहुल काकडे यांनी खासदारांवर बोचरी टीका केली. “फक्त स्टंट करण्यासाठी आणि रील काढण्यासाठी पत्र दिले, बैठक घेतली म्हणजे प्रश्न मार्गी लागत नाहीत. प्रश्न मार्गी लावण्यासाठी समज आणि आवाका लागतो, जो खासदारांकडे नाही. यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत जनतेने आपल्याला तिसऱ्या नंबरवर ढकलले आहे. तरीही पालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर गुरव यांना शहाणपण आलेले नाही. ज्याचा नेताच अडाणचोट आहे, त्याच्या कार्यकर्त्याकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे,” अशा खरमरीत शब्दांत काकडे यांनी समाचार घेतला आहे.




