धाराशिव – पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती वशिल्याने झाल्याची बातमी धाराशिव लाइव्हने ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीला आता पृष्टी मिळाली आहे. पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी करून मोरेची ऑर्डर काढली आहे, हे आता समोर आले आहे. त्याचा व्हिडिओच धाराशिव लाइव्हच्या हाती लागला आहे.
पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची ३ नोव्हेंबर नियुक्ती करण्यात आली आहे . मागील वर्षी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही नियुक्ती वशिल्याने झाल्याची बातमी धाराशिव लाइव्हने दि. ५ नोव्हेंबर रोज्जी प्रसिद्ध केली होती. ही बातमी अखेर तंतोतंत खरी ठरली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती
हा घ्या पुरावा
स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा, त्यांची ऑर्डर आजच्या आज काढा, सांगेल ते करायचे , मी मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही, अशी दमबाजी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सार्वजिनक ठिकाणी केली आहे. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद दररोज सोन्याचे अंडे देणारे पद असल्याने या क्रीम पोस्टींगवर अनेकांचा डोळा होता. या शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते, पण मागील एक महिन्यापासुन या पदावर वर्णी लागावी म्हणून चार पोलीस निरीक्षकांनी आपापल्या ‘गॉडफादर’ मार्फत जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यात वादग्रस्त आणि भ्रष्ट पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून यशस्वी ठरले आहेत.
निलंबित पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी
अवैध मद्यविक्रीला पाठीशी घातल्याच्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना शासनाने मागील वर्षी निलंबित केले होते. . १८ ऑगस्ट २०२२ रोजी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुटखा, मटका, जुगार, तसेच मद्यविक्री यांचे अवैध धंदे चालू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वासुदेव मोरे यांच्या निलंबनासह कारवाई करण्यात अकार्यक्षम ठरल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुनील जायबाय यांचे अकार्यकारी पदावर स्थानांतर करण्याची घोषणाही तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी केली होती. या निलंबित पोलीस निरीक्षकाला धाराशिवला स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वादग्रस्त कारकीर्द
- पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांची बीडमधील कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. मे २०२० मध्ये बीड शहर पोलीस स्टेशनला असताना, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी लॉकडाऊनमधील संचारबंदी शिथिलतेच्या काळात व्यापाऱ्यांना मारहाण केली होती.त्याची तक्रार आ. विनायक मेटे यांनी केली होती. त्यामुळे त्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली होती.
- १८ ऑगस्ट २०२२ रोजी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुटखा, मटका, जुगार, तसेच मद्यविक्री यांचे अवैध धंदे चालू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर ते पुन्हा पोलीस खात्यात जॉईन होताच, बीडहुन धाराशिवला बदली झाली असता, त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
-
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाची महत्वाची भूमिका असते, पण वादग्रस्त पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने केवळ ‘वसुली’ करण्यासाठी नेमण्यात आले का ? असा प्रश्न विचारला जात आहे.