धाराशिव – तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील ( माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त धाराशिव लाइव्हने १ एप्रिल रोजी दिले होते. या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, अर्चनाताई पाटील आज ( गुरुवार ) राष्ट्रवादी अजित पवार गटात रीतसर प्रवेश करणार असून, त्यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे ‘एकला चलो रे’ प्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत असले तरी, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना धाराशिवच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप , शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) नेत्यांनी एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमुखी निर्णय घ्यावा, त्यावर मी ( देवेंद्र फडणवीस ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्कामोर्तब करतील,.असे उत्तर दिले होते. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते. अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवची जागा राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) ला सुटली आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार इच्छुक असले तरी बिराजदार हे प्रभावी उमेदवार ठरू शकत नाहीत, म्हणून त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर होते, पण आणखी चार वर्षे कालावधी बाकी असल्याने काळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा आणि ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार यांनी धरला पण राणा पाटील यांनी आपले भाजपमध्ये व्यवस्थित बस्तान बसल्याचे सांगून नकार दिला. यातून मार्ग काढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन महायुतीची उमेदवारी देण्याची कल्पना समोर आली.
अर्चनाताई पाटील यांनी कधीच भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर तेर जिल्हा परिषद गटातुन सदस्य म्हणून निवडून आलेल्या होत्या.त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर म्हणणे चुकीचे ठरेल, असे एका कार्यकर्त्याचे म्हणणे होते. परंतु राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये गेल्यापासून अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीमध्ये कधीच सक्रिय दिसल्या नाहीत
राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचा अजित पवार यांच्याशी पुन्हा घरोबा वाढला होता. अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार या राणा जगजितसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. या कौटुंबिक संबंधामुळेच अर्चनाताई पाटील यांना धाराशिव मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. अर्चनाताई पाटील आज गुरुवारी रीतसर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असून, त्यांना लगेच उमेदवारी जाहीर होणार आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे.
पाटील कुटुंबात महायुती
आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोचक टीका केली आहे. राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करावा, म्हणजे पाटील कुटुंबात महायुती तयार होईल, असे ओमराजे यांनी जाहीर सभेत खिल्ली उडवली आहे.