धाराशिव – यशवंत नगर, सांजा येथे एका तरुणीवर फोन न उचलल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पांडुरंग अर्जुन शिंदे याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा अनिल आदलिंगे (वय 24, रा. यशवंत नगर, सांजा) यांना 28 जानेवारी 2025 रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शिंदे याने फोन केला. राधा यांनी फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या शिंदेने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर त्याने लोखंडी पाईपनेही राधा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राधा या जखमी झाल्या असून त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
या घटनेनंतर राधा आदलिंगे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग शिंदे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग शिंदे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.