भूम – पिंपळगाव येथे शेतात काम करणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धावर चार जणांनी लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना दि. २३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर सुदाम म्हस्के (वय ६५, रा. पिंपळगाव) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. तर रघु मारुती म्हस्के, गोकुळ मारुती म्हस्के, संगीता रघु म्हस्के, शालन गोकुळ म्हस्के (सर्व रा. पिंपळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ईश्वर म्हस्के हे पिंपळगाव शिवारातील आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून कुऱ्हाडीच्या दांड्यानेही हल्ला केला. या हल्ल्यात म्हस्के जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या घटनेनंतर ईश्वर म्हस्के यांनी दि. २९ जानेवारी रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.