लोहारा – लोहारा तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत दीड लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
रेबेचिंचोली येथील सुभाष मनोहर देशमुख (वय ५९) यांच्या घराचे कुलूप २९ जानेवारी रोजी मध्यरात्री ते दुपारी १.३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तोडले. घरात प्रवेश करून १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १०,००० रुपये रोख असा एकूण ५५,००० रुपये किमतीचा माल चोरून नेण्यात आला.
त्याचप्रमाणे, होळी येथील विमलबाई भिल्लू चव्हाण (वय ७४) यांच्या घराचे कुलूप २७ जानेवारी रोजी रात्री ११ ते २८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान तोडण्यात आले. यावेळी ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० ग्रॅम चांदीचे चैन आणि २९,००० रुपये रोख असा एकूण १,१५,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
दोन्ही घरफोड्यांच्या घटनांमध्ये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवून चोरट्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.