ढोकी (धाराशिव) – सध्या तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आणि बँकेत नाव नाही, अशी दुर्दशा पाहायला मिळतेय. कारण, मोबाईल रिचार्जच्या ऑफरच्या नावाखाली ‘नावी ॲप’ने गावभर ‘नावडता’ घोटाळा घडवलाय! एक रुपयात वर्षभराचा मोबाईल रिचार्ज मिळवण्याच्या नादात ढोकीसह शेकडो गावांतील तरुणांनी स्वतःच्या बँक खात्यावर ‘फ्रीज’ मारून घेतला आहे.
मोबाईल रिचार्ज की ‘बँक बिघाड’?
“फक्त 1 रुपयात 3,999 रुपयांचा रिचार्ज!” – ही ऑफर बघून ढोकीतील 200-300 तरुण भलत्याच आनंदात! पण ख्रिसमसचा गिफ्ट समजून घेतलेल्या या ‘भरगच्च’ रिचार्जमुळे आता बँक खात्यावर चक्क जप्ती आलीय. ₹3 लाखांपर्यंत कर्जाची पावती हातात पडलीय आणि बँकेच्या दारात धावाधाव सुरू आहे.
‘रिचार्ज’ केला, आता ‘वसुली’ भरा!
या ऑफरचा मोठ्या प्रमाणात ‘विकत घेतलेला’ आनंद आता सक्तीच्या वसुलीत बदललाय. पेट्रोल पंपावरील कर्मचारी, किराणा दुकानदार, मजुरांसह बेरोजगार तरुण या स्कीमच्या जाळ्यात अडकलेत. युपीआयद्वारे पैसे भरून रिचार्ज घेतला पण आता बँक खाते ‘मायनस’ मध्ये गेलंय!
ढोकीत ‘कोटींचं’ ट्रान्झेक्शन, पण पैसे गेले कुठे?
ढोकी गावात तब्बल 2 ते 3 कोटींचे ट्रान्झेक्शन झाले असल्याचा अंदाज आहे. गावभर हाच चर्चेचा विषय! मित्र-नातेवाईकांच्या मोबाईलवर सुद्धा ‘स्मार्ट’पणा करत रिचार्ज मारणाऱ्या तरुणांना आता जबर फटका बसलाय. बँकेत जाऊन खातं होल्ड उठवा म्हणावं तर बँक अधिकारी सांगतायत, “बँकेचा यात काही संबंध नाही!”
‘नावी’ काढा नाहीतर…
या सगळ्या फसवणुकीमुळे ढोकीसह अनेक गावांतील तरुण पुरते संकटात सापडलेत. आता तरुण बँक, पोलिस, सायबर सेल यांचे उंबरठे झिजवताना दिसतायत. काहींच्या घरच्यांनी उधारीचा हिशोब विचारायला सुरुवात केलीय!
शेवटी धडा काय?
एका रुपयाच्या नादात संपूर्ण भविष्य गहाण ठेवायचं नसेल, तर कोणत्याही ‘अघोरी ऑफर’वर विश्वास ठेऊ नका! मोबाईल रिचार्जसाठी ‘फुकट’च्या नादी लागू नका, नाहीतर हातात मोबाईल राहील पण बँक खातं राहणार नाही!
Video