कळंब शहरात एका तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गाडीच्या रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट मच्छिंद्र गायकवाड (वय ३३, रा. भीमनगर, कळंब) हे १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता येरमाळा-कळंब रस्त्यावर, पोलीस ठाण्यासमोर तसेच तहसील कार्यालयासमोर असताना आरोपी आकाश भागवत चोंदे (रा. मोहेकर कॉलेजसमोर, कळंब) याने त्यांना काहीही कारण नसताना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने सम्राट गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी गाडीच्या रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी आरोपीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी सम्राट गायकवाड यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी आकाश चोंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), १२६(२), ३५२, ३५१(२)(३) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.



