वाशी – तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ शिवशक्ती साखर कारखान्याजवळील पानटपरीसमोर, तांदुळवाडी शिवारात बालाजी लहु कवडे (वय ४०, रा. पारा रोड, वाशी) यांच्यासोबत मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला.
या प्रकरणी विशाल दिगंबर चेडे, दिग्वीजय प्रशांत चेडे, ओम दादासाहेब चेडे, कृष्णा सतिश शेरकर आणि अजय बाळासाहेब कुंदळे (सर्व रा. वाशी) यांच्यावर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत बालाजी कवडे गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी बालाजी कवडे यांनी १४ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडूनही तक्रार
दरम्यान, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशाल दिगंबर चेडे (वय २६, रा. चेडे गल्ली, वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास तांदुळवाडी शिवारातील भैरवनाथ शिवशक्ती साखर कारखान्याजवळील हॉटेल भैरवनाथसमोर मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला.
या तक्रारीत बालाजी लहु कवडे आणि अजय संजय साळुंके (दोघे रा. वाशी) यांनी विशाल चेडे तसेच दिग्वीजय प्रशांत चेडे आणि अजय बाळासाहेब कुंदळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
विशाल चेडे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.



