धाराशिव : लातूर-हडपसर (01429/01430) ही रेल्वे गाडी पूर्ववत चालू ठेवावी, तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहेब नांदेड (01429/01430) या गाडीला धाराशिव आणि बार्शी येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी धाराशिवचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या मागणीचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी लातूर-मुंबई (22107/22108) आणि नांदेड-पनवेल (17613/17614) या गाड्यांना कळंब रोड (तडवळा स्टेशन) आणि ढोकी येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी थांब्यांची मागणी
गेल्या काही काळापासून प्रवाशांकडून या गाड्यांना धाराशिव, बार्शी, कळंब रोड (तडवळा स्टेशन) आणि ढोकी येथे थांबा देण्याची मागणी होत आहे. प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी आणि स्थानिकांना सोयीसाठी हे थांबे देणे आवश्यक असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिकांची मागणी आणि खासदारांची पुढाकार
धाराशिव, बार्शी आणि परिसरातील नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या गाड्यांचे थांबे मिळाले नाहीत. या मागणीला पाठिंबा देत खासदार ओमप्रकाशरा जेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना भेटून त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागणीचा अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे खासदारांनी सांगितले. या मागणीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.