तुळजापूर हे ऐतिहासिक नगरीचे नाव! आई तुळजाभवानीच्या चरणाशी वसलेले शहर! अनेक पिढ्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपणारे हे ठिकाण. मात्र, सध्या तुळजापूरच्या नावावर लागलेला काळा डाग पुसणे कठीण झाले आहे. कारण काय? ड्रग्ज तस्करी आणि गुन्हेगारीच्या कुरघोड्या!
आज तुळजापूरचा उल्लेख आला की, लोकांच्या डोक्यात ड्रग्ज, गुन्हेगारी आणि माफिया राज याद येतात. एकेकाळी भाविकांचा सडा असलेली ही नगरी आता ड्रग्ज तस्करांचे केंद्र म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या स्थितीचे गांभीर्य तेव्हाच समजते, जेव्हा गावागावांतून किमान १०-१२ गावांनी ठामपणे निर्णय घेतला की, “आता तुळजापूरच्या तरुणांना पोरी देणार नाही!”
हा निर्णय केवळ तुळजापूरच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी लज्जास्पद आहे. ड्रग्ज माफियांच्या अनियंत्रित धिंगाण्यामुळे संपूर्ण शहराच्या अब्रूला गालबोट लागले आहे.
पोरी मिळणार नाहीत – कारण काय?
तुळजापूरच्या मातांच्या चेहऱ्यावर काळजी आहे. बापांच्या मनात अपमानाची भावना आहे. कारण शहराची प्रतिमा इतकी मलीन झाली आहे की, आता इतर गावांतील लोक तुळजापूरच्या मुलांशी नाते जोडण्यास तयार नाहीत.
गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ड्रग्ज आणि गुन्हेगारीशी संबंधित कुटुंबांशी नाते जोडणे म्हणजे आमच्या मुलींचे आयुष्य धोक्यात घालणे. आम्ही आमच्या पोरांच्या भवितव्याची चिंता करतो.”
हा निर्णय ऐकून तुळजापूरच्या तरुणांची नाराजी स्वाभाविक आहे. अनेक तरुणांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. “गुन्हेगार आणि माफियांनी केलेल्या पापांचा फटका आमच्यासारख्या निरपराध तरुणांना का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपच्या नेत्यांचा वरदहस्त?
या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी नगरसेवक राहुल खपले यांनी थेट आरोप केला आहे की, या ड्रग्ज रॅकेटमधील काही प्रमुख आरोपी भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते स्थानिक आमदारांचे कट्टर समर्थक आहेत.
“या आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे? स्थानिक आमदारांनी खुलासा करावा!” – असा थेट सवाल करत त्यांनी राजकीय वरदहस्तावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
तरुणांचे काय?
आता प्रश्न उभा आहे तो तुळजापूरच्या निरपराध तरुणांचा! राजकारणाच्या खेळात आणि ड्रग्ज माफियांच्या धंद्यातून त्यांच्या आयुष्यावरच गंडांतर आले आहे. “आम्ही काहीही केले नाही, मात्र आमच्यावर ड्रग्ज माफियांचा शिक्का का?” असा आक्रोश शहरभर पसरलेला आहे.
ड्रग्ज माफियांनी आणि राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांनी तुळजापूरची इज्जत लिलावात टाकली आहे. मातृभूमीचे नाव बदनाम करणाऱ्या या माफियांवर कठोर कारवाईची मागणी आता वाढली आहे. पोलिसांनी या गुन्हेगारी टोळक्याचा बिमोड करावा आणि निष्पाप तरुणांना बदनामीपासून वाचवावे.
मुलींनो, तुळजापूरच्या तरुणांना संधी द्या!
खरेतर, संपूर्ण तुळजापूर शहर आणि त्यातील तरुण दोषी नाहीत. काही माफिया आणि राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांमुळे संपूर्ण शहराला काळिमा फासला गेला आहे.
मुलींनो, तुळजापूरच्या सर्वच तरुणांना गुन्हेगार म्हणून पाहणे चुकीचे आहे. अनेक कुटुंबे प्रतिष्ठित आणि जबाबदार आहेत. या काही मोजक्या पाप्यांमुळे संपूर्ण शहराला दंडित करू नका!
धाराशिव लाइव्हची ठाम भूमिका:
धाराशिव लाइव्ह सत्य मांडत राहील! आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. तुळजापूरच्या तरुणांना न्याय मिळावा आणि ड्रग्ज माफियांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू.
तुळजापूरची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन गुन्हेगारीविरोधात ठाम भूमिका घ्यावी.
सत्यावर विश्वास ठेवा – धाराशिव लाइव्ह!