धाराशिव: कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 25) धाराशिव शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळच्या सुमारास आमदार कैलास पाटील यांनी श्री धारासुरमर्दिनी देवीची महाआरती करून आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी देवीला आपल्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर त्यांनी हजरत ख्वाजा शमसोद्दिन गाजी यांच्या दर्ग्यात चादर अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदराने अभिवादन केले.
जिल्हा स्त्री रुग्णालयात रवि वाघमारे यांच्या वतीने नवजात बालकांना कपडे आणि त्यांच्या मातांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. नगर परिषद शाळा क्र. 22 मधील विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये माजी नगराध्यक्ष दत्ता आप्पा बंडगर, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहर प्रमुख रवि वाघमारे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.