विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेत परंडा मतदारसंघात अत्यंत चुरशीची आणि रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यात ही लढत होत आहे. अखेर परंडामधून शिवसेना शिंदे सेनेचे आ. तानाजी सावंत १५०९ मतांनी विजयी झाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अत्यंत अटीतटीच्या लढतीत 1,509 मतांनी विजयी झाले. सावंत यांना 103254 मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांना 101745 मते मिळाली.
२२ फेऱ्यांनंतर सावंत आघाडीवर
सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या २७ पैकी २२ फेऱ्यांमध्ये तानाजी सावंत यांनी ८२,१०६ मते मिळवत २१०८ मतांनी आघाडी घेतली आहे. तर, राहुल मोटे यांनी ७९,९९८ मते मिळवली आहेत. ही आघाडी पाहता मतदारसंघातील वातावरण अधिक तापलेले दिसत आहे.
अद्याप पाच फेऱ्या शिल्लक
एकूण २७ फेऱ्यांपैकी २२ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे अंतिम निकालासाठी अजून वेळ लागणार आहे. उर्वरित पाच फेऱ्यांमध्ये कोणतीही घडामोड होऊ शकते, त्यामुळे ही आघाडी कायम राहते की मोटे यांच्याकडे कल झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण
दोन्ही गटांचे कार्यकर्ते प्रचंड उत्सुकतेने आणि थोड्या तणावात निकालाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये विजयी घोषणा आणि जल्लोष दिसत आहे, तर काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे, आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता बाळगली जात आहे.
परंडा मतदारसंघाचा निकाल राज्यभरासाठी महत्त्वाचा
परंडा मतदारसंघातील ही लढत केवळ स्थानिक नाही, तर राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरू शकते. शिवसेना शिंदे गटासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा पराभव मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे सर्वच राजकीय नेते आणि कार्यकर्ते या निकालाकडे डोळे लावून आहेत.
संपूर्ण निकालासाठी प्रतीक्षा
उर्वरित फेऱ्यांनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ही चुरशीची लढत शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार ठरणार असल्याचे दिसत आहे. राज्यातील राजकीय वर्तुळ आणि मतदारसंघातील जनतेसाठी हा निकाल निर्णायक ठरणार आहे.