तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मोठा विजय मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली.
मतमोजणीच्या सर्व ३० फेऱ्या संपल्या असून . राणा जगजितसिंह पाटील यांनी 131863 मतांसह दणदणीत आघाडी घेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांना 36879 मतांच्या फरकाने हरवले. ऍड. धीरज पाटील यांना 94984 मते पडली.

इतर पक्षांची कामगिरी
समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद रोचकरी यांना 16186 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीच्या स्नेहा सोनकाटे यांना केवळ 7805 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजपला पसंती दिल्याचे मतमोजणीच्या निकालातून स्पष्ट झाले.
विजयामागची कारणे
आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या विजयामागे त्यांची गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे, तुळजापूर शहर व ग्रामीण भागात राबविलेल्या पायाभूत सुविधा, आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात राणा पाटील यांना पाठिंबा दिला.
तसेच, त्यांच्या कार्यकाळात रस्ते विकास, जलसिंचन प्रकल्प आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या प्रकल्पांवर भर दिला गेला. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे काम चर्चेत राहिले.
भाजपची विजयाची रणनीती प्रभावी
भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार मोहीम राबवली. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेत्यांनी तुळजापूरमध्ये सभा घेतल्या. राणा पाटील यांचे व्यक्तिगत जनसंपर्कही प्रभावी ठरले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांचा विजय मोठ्या फरकाने सुनिश्चित झाला.
मतदारसंघातील वातावरण
निकाल जाहीर होताच तुळजापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका, आणि राणा पाटील यांचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मतदारसंघातील नागरिकांनी देखील या विजयाचा उत्साहाने स्वीकार केला.या विजयामुळे तुळजापूरमध्ये भाजपच्या प्रभावाला आणखी बळ मिळाले आहे. आ. राणा पाटील यांचा हा विजय मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचे मानले जात आहे. यामुळे तुळजापूरच्या आगामी विकास योजनांना गती मिळेल, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा आहे.