उमरगा विधानसभा मतदारसंघात सलग तीन निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक करणारे शिवसेनेचे ( शिंदे गट ) माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवखे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी चौगुले यांचा 3965 मतांनी पराभव केला आहे.
प्रवीण स्वामी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या 23 व्या फेरीअखेर स्वामी यांना 96206 मते मिळाली, तर चौगुले यांना 92241 मते मिळाली. हा विजय निर्णायक ठरला असून मतदारांनी चौगुले यांच्या नेतृत्वावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
लोहारा तालुक्याचा निर्णायक वाटा
उमरगा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहारा तालुक्याने प्रवीण स्वामी यांना ७,००० मतांची मोठी आघाडी दिली. यामध्ये अनिल जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे विशेष योगदान आहे.
२००९ ची लोकसहभागाची निवडणूक
२००९ साली मतदारांनी पैसे गोळा करून ज्ञानराज चौगुले यांना निवडून दिले होते. मात्र, सत्तेचा माज आणि स्थानिकांशी दुरावा यामुळे मतदारांमध्ये असंतोष पसरला. यावेळी, मतदारांनी त्याच पद्धतीने पैसे गोळा करून स्वामी यांना पाठिंबा दिला आणि चौगुले यांचा पराभव घडवून आणला.
भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष महागात
भाजप मित्रपक्ष असूनही, चौगुले यांनी भाजप कार्यकर्त्यांकडे सापत्न वागणूक ठेवली. यामुळे त्यांच्याविरोधातील नाराजी अधिक तीव्र झाली आणि त्यांचा पराभव अटळ ठरला.
राज्यात महायुतीची लाट असतानाही चौगुले यांचा झालेला पराभव उमरगा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांची जाणीव करून देणारा ठरला आहे.
धाराशिव लाइव्हचे भाकीत खरे ठरले !
यंदाच्या निवडणुकीत आ. ज्ञानराज चौगुले हे डेंजर झोनमध्ये असल्याचे भाकीत धाराशिव लाइव्हने व्यक्त केले होते. हे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.