मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज एक शासन आदेश जारी करून अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) व कलम ४ (५) मधील तरतुदींनुसार, सार्वजनिक सेवेच्या आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, प्रकाश नथु अहिरराव, जे सध्या अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार येथे कार्यरत आहेत, त्यांची बदली धाराशीव येथील रिक्त पदावर अपर जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांना नवीन नियुक्तीच्या जागी रुजू होण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यमुक्त करण्यात येत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनाला त्वरित कळवावे, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्यास, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या शासन आदेशाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
धाराशिवला गेले काही महिने अप्पर जिल्हाधिकारी पद रिक्त होते. उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. यावरून वादंग माजले होते.