धाराशिव – तालुक्यातील तेरजवळील तेरणा धरणाच्या पुलावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एका एसटी बसचा भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील सर्व ६ प्रवासी सुखरूप बचावले.
तुळजापूर आगाराची एम एच १४ बीटी १६३९ क्रमांकाची सोलापूर-तेर-कळंब ही बस तेर येथून सकाळी कळंबच्या दिशेने निघाली होती. चालक काशीनाथ बोंदर आणि वाहक शोभा पवार यांच्यासह बसमध्ये इतर प्रवासी होती. तेरपासून अवघ्या ३ किमी अंतरावर तेरणा धरणाच्या पुलावर चालकाने डाव्या बाजूला वळण घेतले. त्याच वेळी अचानक बसचे स्टिअरिंग जाम झाले. त्यामुळे बस पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकली.
सुदैवाने, चालक काशीनाथ बोंदर यांनी प्रसंगावधान राखत हँडब्रेक लावला. त्यामुळे २० फुटांवरून कोसळताना बस थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. कठड्याला धडकल्याने बसचा पुढचा भाग थोडाफार दुखावला गेला. मात्र, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती चालकाने दिली. बस कठड्यावर थांबताच चालकाच्या दरवाजातून प्रवासी तातडीने खाली उतरले.
“तेरणा धरणाच्या पुलावर डाव्या बाजूला वळण घेत असताना स्टिअरिंग जाम झाली. ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, तरी बस पुलाखाली जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने हॅण्डब्रेक दाबला. तोपर्यंत बस कठड्याला धडकली होती. सर्व प्रवाशांना चालकाच्या दरवाजातून बाहेर काढले,” असे बसचालक काशीनाथ बोंदर यांनी सांगितले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते.