धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची गाडी लुटून ‘चोरावर मोर’ होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत , धाराशिव शहराजवळ मंगळवारी रात्री असाच प्रकार घडला आहे. शहरांत येणारी गुटख्याची गाडी लातूरच्या टोळीने वडगाव ( सि ) जवळ लुटताना तुळजापूरच्या टोळीने त्यांना पकडले, यावेळी पाच पैकी दोन आरोपी पळाले आणि तीन आरोपी सापडले , त्यांच्याविरुद्ध दरोड्याची फिर्याद देण्यास गुटखा तस्कर शहर पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, पोलिसांनी दबाव टाकत फिर्याद मागे घेण्यास भाग पाडले आणि जे आरोपी पकडले त्यांनाही पोलिसांनी सोडून दिले. हे सर्व शहर पोलिस स्टेशनच्या कॅमेरात कैद झाले आहे.
धाराशिव शहरात येणारा गुटखा कर्नाटक राज्यातील हुमानाबाद येथून उमरगा, नळदुर्ग , तुळजापूर मार्गे येतो. मंगळवारी रात्री शहरातील एका गुटखा तस्कराची गाडी तुळजापूर पास करून वडगाव ( सि ) जवळ येताच, लातूरच्या एका गुटखा लुटणाऱ्या टोळीने सदर गाडी आडवून चालकास मारहाण केली. त्यानंतर गाडीतील गुटखा काढून घेणार इतक्यात तुळजापूरची PK टोळी आली आणि त्यांनी लातूरच्या टोळीला मारहाण सुरु केली. त्यात पाच पैकी दोन आरोपी पळाले आणि तीन आरोपी सापडले ,नंतर या आरोपीना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याप्रकरणी गुटख्याची फिर्याद देण्याऐवजी दरोड्याची फिर्याद शहरातील गुटखा तस्कर देणार होता, पण त्यांना तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा वसूलदारानी दबाव आणून फिर्याद मागे घेण्यास भाग पडले. त्यामुळे सापडलेले तिन्ही आरोपीना सोडून देण्यात आले. हा गुटखा तस्कर नेमका कोण आहे, आरोपी नेमके कोण आहेत हे धाराशिव शहर पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मंगळवारचे सीसीटीव्ही तपासून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
धाराशिव शहरात जो गुटखा वितरित होतो. त्याचे गोडावून नेमके कुठे आहे, याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. हा गुटखा तस्कर एका वसूलदाराचा जवळचा नातेवाईक आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल सुरु आहे.