धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तामलवाडी, नळदुर्ग, ढोकी आणि अंबी पोलीस ठाण्यांमध्ये अलीकडेच घरांची तोडफोड, म्हशींची चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरतगाव येथे दि. 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 3.73 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पांडुरंग सुखदेव गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग गुंड यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे दशरथ भिमा देवकर, सुरेश साहेबु चौगुले आणि राजाराम आण्णाप्पा धोत्रे यांच्या घरांची कुलूपे चोरट्यांनी तोडली. घरात प्रवेश करून चोरट्यांनी 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख 17,900 रुपये आणि बोकूड असा एकूण 3,73,900 रुपये किमतीचा माल चोरून नेला.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
50 हजारांची म्हैस चोरी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटगाव येथे 24 ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी राजेश प्रकाश महाजन यांच्या शेतातील गोठ्यातून 50 हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेली. या प्रकरणी सरफराज अलताफ घाटवाले आणि अविनाश आण्णाराव वाघमारे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश महाजन यांनी 26 ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजल्यापासून 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी शेत गट क्रमांक 516 मधील त्यांच्या शेतातील गोठ्यातून म्हैस चोरून नेली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
७० हजारांच्या दोन म्हशी चोरीला, गुन्हा दाखल
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेर गावात २४ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी राहुल विश्वनाथ नाईकवाडे यांच्या शेतातून दोन म्हशी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या म्हशींची किंमत ७० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल नाईकवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून २५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी तेर शिवारातील शेत गट क्रमांक ११७६ मधील मुळेवाडी रोडलगत असलेल्या त्यांच्या शेतातून या म्हशी चोरून नेल्या.या प्रकरणी राहुल नाईकवाडे यांनी २६ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
अंबी : २१ हजारांची मोटरसायकल चोरीला, गुन्हा दाखल
अंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेकटेवाडी येथे २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बाळु नेमीनाथ केसकर यांची २१ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक एमएच १२ ईडब्ल्यु ०५९७) चोरून नेली. ही मोटरसायकल जेकटेवाडी येथील भारतबाबा मोटार गॅरेजसमोरून चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी बाळु केसकर यांनी २६ ऑगस्ट रोजी अंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.