धाराशिव – तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तुळजापूर येथे कार्यरत असलेला कंत्राटी लिपिक अतुल शहाजी देशमुख (वय 37) याला 300 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारीचा तपशील
धाराशिव जिल्ह्यातील एका 65 वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलाच्या नावाने शेतात तुती रेशीम लागवडीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल केला होता. प्रशासनाने 6 ऑगस्ट 2024 रोजी या प्रकल्पासाठी 4,18,815 रुपये मंजूर केले होते. तक्रारदाराने शेतात लागवड करून पाच मस्टर कार्यालयात सादर केले. यापैकी चार मस्टरचे 27,621 रुपयांचे बील मंजूर झाले, परंतु त्यांना अद्याप पैसे मिळाले नव्हते.
लाच मागणी व सापळा कारवाई
तक्रारदाराने नमुना क्रमांक 04 अंतर्गत मागील आठवड्याचे मनरेगा ऑनलाईन ई-मस्टर काढण्यासाठी अर्ज केला असता, आरोपी लिपिक अतुल देशमुख याने पंचासमक्ष 300 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तत्काळ ACB कडे तक्रार दाखल केली.
यानुसार, आज 29 जानेवारी रोजी ACB च्या पथकाने तुळजापूर येथे सापळा रचला. आरोपी देशमुख याने तक्रारदाराकडून 300 रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी
- सापळा अधिकारी: पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे (धाराशिव युनिट)
- मार्गदर्शक अधिकारी: पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव (छत्रपती संभाजीनगर)
- सापळा पथक: पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, शशिकांत हजारे
नागरिकांना आवाहन
ACB विभागाने नागरिकांना कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क:
- धाराशिव ACB कार्यालय: 02472-222879
- टोल फ्री क्रमांक: 1064