उमरगा – तालुक्यातील एकुरगा गावात शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयत डिगंबर रामा जेवळे (वय ६०) यांनी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गावातीलच खंडू जेवळे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतीच्या वादातून मानसिक त्रास
या प्रकरणी मयताच्या पत्नी सुरेखा जेवळे यांनी १७ ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, गावातीलच किसन तुळशीराम जेवळे, खंडु किसन जेवळे, शेषेराव किसन जेवळे, श्रीधर किसन जेवळे आणि आदित्य खंडू जेवळे या पाच जणांनी मयत डिगंबर जेवळे यांना शेतीच्या वादातून सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. तसेच या पाच जणांनी मयतांचा मुलगा योगेश यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकारामुळे डिगंबर जेवळे यांना मानसिक त्रास झाला होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीसांकडून गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी सुरेखा जेवळे यांच्या फिर्यादीनुसार किसन तुळशीराम जेवळे, खंडु किसन जेवळे, शेषेराव किसन जेवळे, श्रीधर किसन जेवळे आणि आदित्य खंडू जेवळे या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान), ५०६ (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोककुमार सोनवणे हे करत आहेत.