धाराशिव | उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असताना बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी मध्यम प्रकल्पात तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतून परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
परंडा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा असून प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्याची आवकच झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुष्काळाची भीती निर्माण झाली असल्याचे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे.
चांदणी मध्यम प्रकल्पातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रकल्प कोरडा पडल्याने बार्शी शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी बार्शी उपसा सिंचन योजनेतून चांदणी प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सध्याही त्याच पद्धतीने पाणी उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून विसर्ग सुरू असतानाच बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी मध्यम प्रकल्प भरावा तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडून परिसरातील पाझर तलाव भरून घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी सुजितसिंह ठाकूर यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.






