सुनील राणे यांचा धाराशिव दौरा आणि त्यानंतर निष्ठावंतांनी फोडलेला टाहो काही वाया गेलेला दिसत नाही. कारण, भाजपच्या या अंतर्गत कुरुक्षेत्रावर आता पहिली ‘विकेट’ पडली आहे. आणि धक्कादायक म्हणजे, हा पहिला बळी दुसरा-तिसरा कुणाचा नसून, थेट नगराध्यक्षांच्या घरातलाच गेला आहे! भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) जिल्हाध्यक्ष पदावरून राहुल काकडे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली असून, त्या जागी गणेश इंगळगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वीच काकडे यांची भाजयुमो जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, त्यांचा राजीनामा न घेताच गणेश इंगळगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘अति तिथे माती’ अन् ‘मल्हार पर्व’ भोवले!
राहुल काकडे हे साधेसुधे प्रस्थ नाही. ते स्वतः नगरसेवक आहेत आणि विद्यमान नगराध्यक्षा नेहा काकडे यांचे पती आहेत. विशेष म्हणजे, ते मूळचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचेच ‘कट्टर समर्थक’ मानले जात. पण राजकारणात साहेबांपेक्षा ‘साहेबांच्या पोराची’ हवा जास्त लागली की काय होतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे राहुल काकडे!
गेल्या सहा महिन्यांपासून काकडे हे दत्ताभाऊंना विसरून थेट आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या ‘भक्तीत’ लीन झाले होते. त्यांच्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘मल्हार दादां’चाच उदो-उदो सुरू होता.
-
“मल्हार पर्व” (जणू धाराशिवमध्ये नवा राजा च अवतरलाय!)
-
“भावी खासदार”
-
“एम डी बोस (MD Boss)”
-
“लक्ष २०२९”
-
“मल्हार दादा भावी खासदार”
इतकंच नाही, तर मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात डिजिटल होर्डींज लावून मल्हार पर्वचा जयघोष केला होता, तसेच दत्ताभाऊकडे न जाता रोज बंगल्यावर हजेरी सुरु होती, यामुळे राहुल काकडे निष्ठावंतांच्या डोळ्यात खुपू लागले होते. एकीकडे ‘राणा पाटील प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध पक्षात भडका उडालेला असताना, काकडेंचे हे ‘मल्हार पर्व’ थेट हायकमांडच्या रडारवर आले.
राणेंचा दौरा अन् ‘पहिला बळी’
दोन दिवसांपूर्वी जेव्हा पक्षाचे सरचिटणीस सुनील राणे धाराशिवमध्ये आले होते, तेव्हा निष्ठावंतांनी ज्या तक्रारींच्या आणि स्क्रीनशॉटच्या फाईल्स त्यांच्यासमोर आदळल्या होत्या, त्यात राहुल काकडेंच्या या ‘एम डी बॉस’च्या पोस्ट्स आघाडीवर होत्या. राणेंनी यावर लगेच ॲक्शन घेतली आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी एका झटक्यात सही करत आपल्याच माजी ‘कट्टर समर्थका’ला घरचा रस्ता दाखवला!
‘प्रायव्हेट लिमिटेड’चे पंख छाटायला सुरुवात?
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा आहे की, राहुल काकडे यांची हकालपट्टी ही केवळ एका युवा पदाधिकाऱ्याची उचलबांगडी नाही, तर हा थेट ‘राणा पाटील प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला दिलेला सर्वात मोठा झटका आहे! “तुम्ही जर पक्षापेक्षा घराण्याचं आणि चिरंजीवांचं ‘पर्व’ सुरू करणार असाल, तर आम्ही तुमचे पंख छाटायलाही मागेपुढे पाहणार नाही,” हा थेट आणि कडक मेसेज प्रदेश पातळीवरून देण्यात आला आहे. या कारवाईने राणा गटात चांगलीच धडकी भरली आहे.
दत्ताभाऊंचा क्लासिक डायलॉग: “नवीन जबाबदारी देणार!”
या सर्व राजकीय भूकंपावर जेव्हा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी राजकारणातला सर्वात ‘क्लासिक’ आणि विनोदी डायलॉग मारला. ते म्हणाले, “राहुल काकडे यांना आता नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे!”
हे ऐकून धाराशिवचे लोक मात्र हसून हसून बेजार झाले आहेत. कारण सर्वांना माहीत आहे की, ‘नवीन जबाबदारी’ ही राजकारणातील अशी एक अदृश्य गोष्ट आहे, जी कधीच मिळत नाही! सध्यातरी राहुल काकडेंना नवीन जबाबदारी काही मिळालेली नाही, पण जुन्या जबाबदारीतून त्यांची ‘कायमची मुक्ती’ मात्र नक्की झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ‘मल्हार पर्वा’च्या हवेत उडणाऱ्या कार्यकर्त्यांना आता जमिनीवर आणण्याची मोहीम भाजपने सुरू केली आहे. पहिला बळी तर गेलाय, आता या ‘क्लीन-अप’ मोहिमेत साहेबांच्या ‘ब्लंडर बँके’तले आणखी किती जण शहीद होणार, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!






