अणदूर – वळसंग ते चिवरी या ४०० के.व्ही. टॉवरच्या कामाने अणदूरमध्ये विद्युतपेक्षा जास्त राजकीय लहरी निर्माण केल्या आहेत! बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट ली. च्या अधिकाऱ्यांना विजेच्या धक्क्यापेक्षा जोरदार धक्का बसलाय. कारण एका गाव पुढाऱ्याने ‘बिजली की सरकार’ खेळायला सुरुवात केली आहे.
गाव पुढाऱ्याचा ‘कमीशन प्लान’
या पुढाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला सल्ला दिलाय – ‘‘अरे, मला एक लाख, अमक्या मित्राला एक लाख आणि शेतकऱ्यांना एक-दीड लाख दिले, तर काम मोकळं!’’ पण, स्वतः मात्र शेतकऱ्यांना वेगळाच धडा शिकवत आहे – ‘‘प्रत्येक टॉवरला दहा लाख घेतले नाहीत, तर माझं नाव बदला!’’ आता शेतकऱ्यांनाही कळत नाही की या आकड्यांचा आकडा कोण?
धाराशिव Live चा ‘शॉर्ट सर्किट’ खुलासा!
धाराशिव लाइव्हच्या हाती गाव पुढाऱ्याच्या लाच मागण्याचा साक्षात पुरावा लागलाय. म्हणजेच हा पुढारी थेट ‘करंट अफेअर्स’ मध्ये अडकला आहे! आता जर हे कॉल व्हायरल झाले, तर या ‘टॉवर मॅनेजर’ पुढाऱ्याला गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा मिळणार नाही.
‘आका’ आणि ‘बोका’ कोण? लवकरच उघड होईल!
अणदूरमध्ये हा खेळ कोण चालवतंय, हे समजायला फार वेळ लागणार नाही. ‘आका’ कोण आणि ‘आकाचा बोका’ कोण, याचा फडशा लवकरच पडणार! तोपर्यंत अणदूरच्या शेतकऱ्यांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विजेच्या धक्क्याला तयार राहावे, कारण पुढचं नाटक अजून रंगायचंय!
(विशेष: गावकऱ्यांना यावर प्रतिक्रिया द्यायची असल्यास ‘बिजली गई’ म्हणू नये, कारण इथे तर वीज येण्यापूर्वीच जोरदार ‘करंट’ आलाय!)