धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांच्या उभारणीबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यात किती पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत, किती शेतजमीन वापरण्यात आली आहे, शेतकऱ्यांना किती मोबदला देण्यात आला आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
११ वर्षांपूर्वी राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना केली होती. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या समितीची पहिलीच बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी पवनचक्की उभारणीसाठी जागा दिली आहे, त्यांना किती मोबदला मिळाला, कंपन्या किती आहेत, किती पवनचक्क्या उभारल्या आहेत, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही. यावरून शेतकऱ्यांनी प्रशासनाला जबाबदार धरले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख तक्रारी:
- पवनचक्की उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाचक अटी घालून लीजवर घेण्यात आल्या आहेत.
- करारात नमूद केल्यापेक्षा जास्त जमीन कंपनीने ताब्यात घेतली आहे.
- कराराप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाहीये, अल्प मोबदला देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
- शेतकऱ्यांसोबत कंपनीने कमी मोबदल्यात २८ वर्षे ११ महिन्यांचा करार करून घेतला आहे.
- पवनचक्की व रस्ते उभारणीसाठी लागणार्या मुरूम, दगड यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे.
- पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान केले जात आहे.
- अनेक ठिकाणी गौण खनिजाचे अधिक उत्खनन करून त्याचा अत्यंत कमी रॉयल्टी भरली जात आहे.
- जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या नावाखाली कंपनी आणि त्यांच्या एजंटांकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.
प्रशासनाचे आश्वासन:
या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष यादव, अपर पोलीस अधीक्षक हसन गौहर, उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यासह महावितरणचे अधिकारी, महाऊर्जा प्रकल्प व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी पुढील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, महिन्यातून एकदा जिल्हाधिकारी आणि दोन वेळा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात येतील. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यास तहसील कार्यालय स्तरावर बैठका घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
तुळजापुरात गुन्हा दाखल:
दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मेसाई जवळगा येथील सरपंचाच्या गाडीवर पवनचक्कीशी संबंधित असलेल्या गुंडांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनचक्की प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या या वादळाचे पडसाद आता राज्यस्तरावर उमटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.