धाराशिव भाजपमध्ये निष्ठावंतांनी रणशिंग फुंकल्यानंतर आता ‘राणा पाटील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी‘ (म्हणजेच आमदार साहेब, माऊली आणि चिरंजीव) पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. बंडाची धार इतकी तीव्र आहे की, कालपर्यंत हवेत असणारे नेते आता थेट जमिनीवर येऊन सारवासारव करत आहेत. एकीकडे ‘माऊली’ अर्थात अर्चना पाटील यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून यू-टर्न घेतला, तर दुसरीकडे आता थेट लेकाच्या म्हणजेच ‘मल्हार पर्वा’च्या पोस्टही रातोरात गायब होऊ लागल्या आहेत!
‘भावी खासदार’ ते ‘पोस्ट डिलीट’: एका रात्रीत उतरली हवा!
मल्हार पाटील यांचे अत्यंत कट्टर समर्थक आणि साहेबांच्या गोटातील एका ‘जबाबदार’ पदाधिकाऱ्याने आज अचानक आपल्या फेसबुकवरील सर्व पोस्ट घाईघाईने डिलीट केल्या आहेत. हे तेच महाशय आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वी शहरात मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भलीमोठी होर्डिंग्ज लावून वातावरण निर्मिती केली होती.
काय होतं या डिलीट केलेल्या पोस्टमध्ये?
-
“मल्हार पर्व” (जणू काही नवा राजाच आलाय!)
-
“भावी खासदार”
-
“एम डी बोस (MD Boss)”
-
“लक्ष २०२९”
-
“मल्हार दादा भावी खासदार”
कालपर्यंत ही सगळी ‘हवा’ आणि ‘बॅनरबाजी’ जोमात सुरू होती. पण निष्ठावंतांच्या भडक्यामुळे या ‘मल्हार पर्वा’चा फुगा एका क्षणात फुटला आणि रातोरात या सर्व पोस्ट फेसबुकवरून अदृश्य झाल्या!
‘डिजिटल युगात पोस्ट डिलीट होते, पण स्क्रीनशॉट अमर राहतात!’
पण या साऱ्या पोस्ट अचानक डिलीट का झाल्या? यामागचं खरं कारण आहे आज धाराशिवमध्ये होणारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची एन्ट्री!
राणेंच्या बैठकीत ही सगळी ‘घराणेशाहीची’ आणि ‘भावी खासदारांची’ दवंडी पुराव्यासकट सादर केली जाणार होती. हे लक्षात येताच साहेबांच्या ‘ब्लंडर बँके’ने तातडीने धावपळ करत या पोस्ट उडवल्या. पण राणा गटाचे हे समर्थक एक गोष्ट विसरले- “डिजिटल युगात पोस्ट डिलीट करता येते, पण निष्ठावंतांनी काढलेले स्क्रीनशॉट अमर राहतात!” निष्ठावंतांनी या सर्व भपकेबाज पोस्टचे स्क्रीनशॉट आधीच काढून ठेवले असून, राणेंच्या स्वागतासाठी ती ‘फाईल’ अगदी तयार ठेवली आहे.
विरोधकांची मज्जा: सोमनाथ गुरव यांचा माऊलींना सणसणीत टोला
इकडे घरातली ही पंचायत सुरू असताना, बाहेर विरोधक मात्र याची पुरेपूर मज्जा घेत आहेत. माऊलींनी “ते स्टेटस माझ्या टीमने विनापरवानगी ठेवले” असा बालिश यू-टर्न घेताच, शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक सोमनाथ गुरव यांनी माऊलींची चांगलीच फिरकी घेतली.
गुरव यांनी सोशल मीडियावर असे दोन बाण सोडले, की राणा समर्थकांना लपायला जागा उरली नाही:
-
टोला पहिला: “ज्यांना स्वतःचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवता येत नाही, ते अक्खा जिल्हा काय सांभाळणार? 😂”
-
टोला दुसरा: “बरं, माऊलींच्या मोबाईलवर जाऊन, त्यांच्या विनापरवाना व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणारा तो ‘हिंमतवान घरभेदी’ नेमका आहे तरी कोण?”
आता लक्ष ‘सुनील राणे’ यांच्या बैठकीकडे!
थोडक्यात काय, तर माऊलींचा खुलाशाचा यू-टर्न, ‘मल्हार पर्वा’च्या डिलीट झालेल्या पोस्ट आणि विरोधकांनी घेतलेली फिरकी, यामुळे राणा गटाची पुरती कोंडी झाली आहे. आता आज सायंकाळी ५ वाजता सुनील राणे यांच्या उपस्थितीत रायगड फंक्शन हॉलमध्ये जेव्हा हे ‘अमर स्क्रीनशॉट’ बाहेर निघतील, तेव्हा कोणता नवा स्फोट होणार? याचीच उत्सुकता संपूर्ण धाराशिवच्या राजकीय वर्तुळाला लागली आहे!




