धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील २२ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आता दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार कैलास पाटील यांनी निलंबित अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
आमदार कैलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ निलंबनाची कारवाई करून हे प्रकरण संपविणे योग्य ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून शासनाचे नुकसान भरून काढण्यासाठी रक्कम वसूल करावी आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.
धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कृषी निविष्ठा वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराची व्याप्ती सुमारे २२ कोटी रुपये असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
आमदार कैलास पाटील यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह विविध स्तरांवर त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. आता निलंबनानंतर त्यांनी पुढचे पाऊल उचलत आर्थिक वसुली आणि फौजदारी कारवाईची मागणी केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दोषींवर केवळ प्रशासकीय कारवाई न करता कायदेशीर कारवाईही झाली पाहिजे, अशी मागणी होत असून या प्रकरणातील शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




