धाराशिव भाजपमधला ‘कोल्ड वॉर’ आता फेसबुकच्या मैदानात थेट ‘गँग वॉर’मध्ये बदलला आहे. जुने निष्ठावंत विरुद्ध ‘नवे’ (अर्थात साहेबांचे समर्थक) असा हा सामना आता इतक्या खालच्या थराला गेलाय की, एकमेकांचे राजकीय कपडे सोशल मीडियावरच उतरवले जात आहेत. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी साहेबांच्या ‘महत्त्वाकांक्षेवर’ बॉम्ब टाकल्यानंतर, आता जुन्या गटाचे ॲड. व्यंकट गुंड यांनी थेट जिल्हाध्यक्षांच्याच कारभारावर बोट ठेवले. पण त्यांना जे चोख प्रत्युत्तर मिळाले, त्याने गुंड यांच्या राजकीय प्रवासाची अक्षरशः पिसे निघाली आहेत!
गुंड यांचा ‘बंगला’ बाऊन्सर!
प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून थेट भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनाच टार्गेट केले. त्यांनी विचारले, “जिल्हाध्यक्षांचा कारभार स्वतःच्या मताने चालतोय की ‘बंगल्याच्या’ आदेशावर? पक्षाचे हित महत्त्वाचे की ‘बंगला’ हित?”
आता हा ‘बंगला’ नेमका कुणाचा आणि इशारा कुणाकडे होता, याचा अर्थ राजकीय वर्तुळाला बरोबर समजला. थेट जिल्हाध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान देणाऱ्या या पोस्टमुळे दत्ताभाऊंच्या समर्थकांचा रागाचा पारा सटकला आणि मग दत्ताभाऊंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले भाजपचे अधिकृत जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले!

प्रवक्ते भोसले यांचा थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुंड यांच्या या बाऊन्सरवर प्रवक्ते भोसले यांनी असा काही ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारला, की गुंड यांची थेट राजकीय कुंडलीच वेशीवर टांगली गेली. भोसले यांनी सणसणीत शब्दांत गुंड यांच्या जुन्या राजकीय ‘उड्यांची’ आठवण करून देत त्यांचा पार पंचनामाच केला.
भोसले आपल्या सडेतोड उत्तरात म्हणाले, “जिल्हाध्यक्षांचा कारभार कसा चालतोय, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे. चार पक्ष बदलत राहून आज निष्ठा आणि पक्षहिताचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार कुणालाही मिळत नाही!” ज्यांनी कठीण काळात नाही, तर फक्त ‘संधी’ पाहून बाजू बदलल्या, त्यांनी निष्ठावंतांना निष्ठेचे धडे देऊ नयेत, असा थेट वार भोसले यांनी केला.

झेडपीतला गद्दारीचा इतिहास आणि निष्ठेचे धडे!
भोसले एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गुंड यांच्या भूतकाळातील ‘पराक्रमाचा’ भंडाफोड केला. भोसले यांनी थेट विचारले, “स्वतःच्या घरात जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाले नाही म्हणून स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात काम करणारे आणि आताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हाच्या विरोधात प्रचार करणारे लोक आज आम्हाला निष्ठा शिकवणार काय?”
थोडक्यात सांगायचे तर, “स्वतःच्या घरात तिकीट नाही मिळालं की पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि आता सत्तेची हवा आल्यावर ‘निष्ठावंत’ म्हणून मिरवायचं, हे चालणार नाही,” हा कडक संदेश यातून देण्यात आला. “ज्यांनी वारंवार राजकीय भूमिका बदलल्या, त्यांनी निष्ठेची भाषा करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे!” हा भोसले यांचा टोला ठाकूर गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
‘खरा निष्ठावंत’ कसा असतो? (दत्ताभाऊंचा दाखला)
गुंड यांनी दत्ताभाऊंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना भोसले यांनी दत्ताभाऊंच्या त्यागाचा इतिहास मांडला. २८ वर्षे सलग निष्ठेने काम करून, जेव्हा पक्षाने आदेश दिला, तेव्हा हातात आलेली ‘विधानपरिषदेची आमदारकी’ एका क्षणात पक्षासाठी सोडणारे दत्ताभाऊ हे २०१६ ते २०२० आणि २०२५ ते आजतागायतचे सर्वात यशस्वी जिल्हाध्यक्ष आहेत, हे भोसले यांनी ठासून सांगितले.
“कोणाच्या आदेशावर कोण चालते यापेक्षा, पक्षाच्या विचारांवर कोण ठाम उभे आहे, हे महत्त्वाचे!” हा भोसले यांचा युक्तिवाद अतिशय लॉजिकल आणि धारदार होता.
पुढचा स्फोट कधी?
थोडक्यात काय, तर ‘बंगल्यावरून’ दत्ताभाऊंना टार्गेट करायला गेलेले ॲड. व्यंकट गुंड स्वतःच भोसले यांच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये घायाळ झाले आहेत. ‘जुना विरुद्ध नवा’ हा भाजपमधला संघर्ष आता रस्त्यावरून थेट सोशल मीडियाच्या रणांगणात आला असून, रोज एका नव्या नेत्याची ‘कुंडली’ बाहेर काढली जात आहे. आता या भोसले यांच्या पोस्टवर सुजितसिंह ठाकूर गट कोणता नवा पलटवार करतो आणि या राजकीय ‘महाभारतात’ पुढची विकेट कुणाची पडते, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!





