‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’च्या मनमानी कारभाराला कंटाळून धाराशिव भाजपमध्ये आता केवळ ‘कोल्ड वॉर’ राहिलेले नाही, तर आता थेट आऊटगोईंगला (Outgoing) सुरुवात झाली आहे. साहेबांच्या (आमदार राणा पाटील) ‘युज अँड थ्रो’ (Use and Throw) पॉलिसीचा फटका बसलेले एकेक शिलेदार आता कमळाची साथ सोडून थेट ‘धनुष्यबाण’ आणि ‘मशाल’ हाती घेऊ लागले आहेत. एकाच दिवशी भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दोन वेगवेगळ्या शिवसेनेत प्रवेश केल्याने साहेबांच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे!
फ्लॅशबॅक अन् ‘ऑपरेशन रोचकरी’: पाठीत खुपसलेल्या खंजिरांचा बदला!
तुम्हाला तुळजापूरचे युवा नेते प्रतीक रोचकरी आठवतात? हे तेच रोचकरी आहेत, ज्यांना साहेबांनी भलीमोठी आश्वासने देऊन पक्षात आणले होते.
-
पहिला खंजीर: भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपद देतो म्हणून हार-तुरे घातले आणि वरती नाव राहुल काकडेंचे पाठवले!
-
दुसरा खंजीर: नगरपालिकेत उपनगराध्यक्षाचे गाजर दाखवले, पण साधे तिकीटही दिले नाही.
-
तिसरा खंजीर: पंचायत समितीत दोन वर्षे सभापती करतो म्हणून शब्द दिला, पण चिवरी गणातून ऐनवेळी तिकीट नाकारून त्यांचा राजकीय खूनच केला!
साहेबांनी केलेल्या या भयंकर विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी रोचकरी यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला आहे. रोचकरींनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट म्हणजे साहेबांच्या वर्मावर मारलेला थेट घाव आहे.
“विश्वासघात झाला म्हणून आम्ही थांबत नाही… धोका देणाऱ्यांना उत्तर आता शब्दांनी नाही, कृतीने देणार! जनतेच्या स्वाभिमानासाठी आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आजपासून शिवसेनेसोबत नवा राजकीय प्रवास सुरू!”
साहेबांनी ज्या युवा नेत्याचा ‘गेम’ केला, तोच नेता आता ओमराजेंच्या साथीने साहेबांचा ‘गेम’ करायला सज्ज झाला आहे!
ॲड. शेटेंचा ‘मातोश्री’वर मुक्काम: एकाधिकारशाहीला राम-राम!
एकीकडे रोचकरींनी उप मुख्यमंत्र्यांची शिवसेना पकडली, तर दुसरीकडे भाजपचे आणखी एक बडे नेते ॲड. रामेश्वर शेटे यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती ‘शिवबंधन’ बांधले आहे.
शेटे यांच्या बंडाचे मूळही साहेबांच्या डिक्टेटरशिपमध्ये (एकाधिकारशाही) दडले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शेटे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. “भाजपमध्ये आता लोकशाही राहिली नसून फक्त एकाच कुटुंबाची (राणा पाटील) एकाधिकारशाही चालू आहे,” असा थेट आरोप करत शेटे यांनी भाजपला कायमचा राम-राम ठोकला आहे.
‘ऑपरेशन डॅमेज कंट्रोल’: रामदास कोळगेंची ‘बोळवण’ की ‘लॉलीपॉप’?

पक्षाला लागलेली ही गळती आणि निष्ठावंतांचा वाढता संताप पाहून साहेबांच्या आणि दत्ताभाऊंच्या (जिल्हाध्यक्ष) पायाखालची वाळू सरकली आहे. यावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी तत्काळ एक ‘लॉलीपॉप’ काढले आणि ते रुईभरचे (ता. धाराशिव) भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते रामदास कोळगे यांच्या हातात दिले!
रामदास कोळगे यांना अचानक भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमागेही एक रंजक इतिहास आहे:
-
जिल्हा परिषद निवडणुकीत रामदास कोळगे हे बेंबळी गटातून इच्छुक होते, पण साहेबांनी त्यांचा पत्ता कट करून तिकीट नाकारले.
-
त्यावेळी त्यांचे बंधू प्रा. जयप्रकाश कोळगे यांनी राणा पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
आता तोच जुना राग शांत करण्यासाठी आणि ‘आम्ही निष्ठावंतांना पदे देतो’ हे दाखवण्यासाठी रामदास कोळगे यांची ही ‘बोळवण’ करण्यात आल्याची पक्षात जोरदार चर्चा आहे. कोळगेंच्या या नियुक्तीनंतर दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी तत्काळ त्यांचे अभिनंदन करत ‘निष्ठावंतांना न्याय मिळाला’ अशी हवा करण्यास सुरुवात केली आहे.
पुढे काय?
थोडक्यात सांगायचे तर, साहेबांच्या ‘मीच जिल्ह्याचा मुख्यमंत्री’ या अहंकारामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आता एकतर बंड करत आहेत किंवा पक्ष सोडून जात आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी कोळगेंसारख्या जुन्या नेत्यांना पदे दिली जात असली, तरी रोचकरी आणि शेटे यांच्या एक्झिटमुळे ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ला मोठे भगदाड पडले आहे, हे नक्की! आता या गळक्या जहाजातून आणखी कोण कोण उड्या मारणार? हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे!



