धाराशिव: टिपेश्वर अभयारण्यातून यवतमाळ जिल्ह्यातून बेपत्ता झालेला टी-22 वाघ अखेर डिसेंबर 2024 मध्ये धाराशिवमध्ये आढळून आला आहे. याला पकडण्यासाठी वन विभागाने आजपासून मोहिमेला सुरुवात केली. यवतमाळ येथील विशेष पथक आज धाराशिवमध्ये दाखल झाले असून, थेट जंगलात जाऊन वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टी-22 वाघ मे 2023 पासून टिपेश्वर अभयारण्यातून गायब झाला होता. धाराशिवमध्ये तो आढळल्यानंतर वन विभागाने त्याला पकडण्याचे नियोजन केले असून, त्याला टिपेश्वरमध्ये न सोडता आता पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात सोडले जाणार आहे.
याबाबत वन विभागाचे अधिकारी रविकांत खोब्रागडे यांनी माहिती दिली की, वाघाला शूट करून बेशुद्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही मोहीम किती दिवस चालेल, हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, 25 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवली जात आहे.
विदर्भाचा हा वाघ आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये स्थानांतरित होणार असून, या मोहिमेचे यश वन विभागासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.