नळदुर्ग: भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या मैलारपूर येथील श्री खंडोबाची पौष पौर्णिमा महायात्रा प्रचंड उत्साह आणि भक्तीभावाने पार पडली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांनी या महायात्रेत सहभाग घेतला होता . दिवसभर “येळकोट येळकोट जय मल्हार” अशा जयघोषात भंडारा (हळद) आणि खोबरे यांची मुक्त उधळण करण्यात आली, त्यामुळे सर्व भाविक पिवळ्या म्हणजेच सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते.
श्री खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. खंडोबाची अनोखी परंपरा म्हणजे त्यांचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. दोन गावे, दोन मंदिरे आणि एकच मूर्ती अशी अनोखी परंपरा असलेल्या मैलारपूर येथील श्री खंडोबाची पौष पौर्णिमा सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
धार्मिक विधी आणि कार्यक्रम:
पौष पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी श्रींचे अभ्यंगस्नान, अभिषेक, महापूजा आणि नंतर दिवसभर नवसाचे कार्यक्रम पार पडले. मैलारपूरचा डोंगर भाविक भक्तांनी गजबजून गेला होता. प्रसादिक भांडार, खेळणी, हॉटेल्स, पाळणे यांची दुकाने थाटण्यात आल्याने जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहने दिसत होती.
नंदीध्वजांचे आगमन आणि भंडारा:
गावोगावच्या एक हजार नंदीध्वज (काठ्या) चे आगमन झाले. आकर्षक रोषणाई केलेले हे नंदीध्वज दिवसभर वाजत-गाजत हलगीच्या तालावर वारू नाचवत येत होते. सोबत भंडारा (हळद) आणि खोबरे उधळण्यात आले. त्यामुळे सर्व भाविक पिवळ्या म्हणजेच सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते.
येणारी प्रत्येक नंदीध्वज मंदिराला प्रदक्षिणा घालून नेमून दिलेल्या जागेवर ठिय्या मांडत होती. भाविक दर्शन रांगेत दर्शन घेत होते. त्यासाठी दर्शन बारी करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
अणदूर-नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वजांचे आगमन:
रात्री बाराच्या सुमारास अणदूर-नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वज (काठ्या) चे आगमन झाले. यावेळी आकाशात रंगीबेरंगी शोभेचे दारूकाम करण्यात आले. त्यानंतर दोन्ही काठ्यांनी मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर दोन्ही गावच्या मानकऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर छबिना प्रारंभ झाला. मंगळवारी पहाटे चार वाजता निघालेला छबिना सकाळी सात वाजता समाप्त झाला.
व्यवस्थापन आणि पोलीस बंदोबस्त:
यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री खंडोबा मंदिर समिती, अणदूर-नळदुर्ग यात्रा कमिटी, नळदुर्ग नगर परिषद आणि असंख्य कार्यकर्त्यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भेट:
या पवित्र प्रसंगी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मंदिरास भेट देऊन श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने सचिव सुनील ढेपे यांनी आमदार पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला.
श्री खंडोबाची पौष पौर्णिमा महायात्रा ही भक्ती आणि श्रद्धेचा एक अविस्मरणीय सोहळा होता. या महायात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी आनंद आणि समाधानाचा अनुभव घेतला.