धाराशिव – जिल्ह्यात पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले असले तरी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती मात्र गंभीर असल्याचे दिसून येत आहे. दारू, मटका, जुगार आणि ड्रग्जसारखे अवैध धंदे बोकाळल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
वादग्रस्त बदल आणि आश्चर्यकारक निर्णय
धाराशिव पोलिस दलातील मोठ्या बदलांमध्ये काही आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः तुळजापूरमधील वादग्रस्त पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांना पोलिस मुख्यालयात बदली करण्याऐवजी धाराशिव शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयाने अनेकांना धक्का बसला असून, कायद्याचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणेकडून अधिक पारदर्शकतेची अपेक्षा केली जात आहे.
नव्या जबाबदाऱ्या आणि प्रश्नचिन्हे
- पोनि विनोद हनमंतराव इज्जपवार – परंडा पोलिस ठाण्यातून स्थानीय गुन्हे शाखा, धाराशिव येथे बदली.
- पोनि अजित तुकाराम चिंतले – लोहारा पोलिस ठाण्यातून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे नेमणूक.
- पोनि सचिन चंद्रकांत यादव – सायबर पोलिस ठाणे, धाराशिव येथून नळदुर्ग पोलिस ठाण्यात बदली.
- सपोनि ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे – धाराशिव शहर पोलिस ठाण्यातून लोहारा पोलिस ठाण्यात नियुक्त.
- सपोनि तात्या रुपाजी भालेराव – तुळजापूर पोलिस ठाण्यातून येरमाळा पोलिस ठाण्यात बदली.
- पोनि आण्णासाहेब रामचंद्र मांजरे – आनंदनगर पोलिस ठाण्यातून तुळजापूर पोलिस ठाण्यात स्थानांतरित.
- पोनि रविंद्र पांडुरंग खांडेकर – तुळजापूर पोलिस ठाण्यातून आनंदनगर पोलिस ठाण्यात नियुक्ती.
धाराशिवकर अस्वस्थ, पोलिस प्रशासन काय करणार?
पोलीस दलातील या बदलांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा होईल का, हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला वाढते गुन्हेगारी आणि दुसऱ्या बाजूला आश्चर्यकारक बदल यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!