धाराशिव: धाराशिव – तुळजापूर हा चारपदरी मार्ग पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली आहेत. परंतु, शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर वडगाव येथील सिद्धेश्वर मंदिराला जाण्यासाठी सर्व्हिस रोड नसल्याने भाविकांना रॉंग साईडने जावे लागते. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आजही अशाच एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
विठ्ठल विश्वनाथ चादरे (वय ४०, रा. सिद्धेश्वर वडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सिद्धेश्वर मंदिर हे श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी भाविकांनी गजबजलेले असते. मंदिराला जाण्यासाठी तेरणा अभियांत्रिकी कॉलेज ते ग्रीन लॅन्ड शाळेपर्यंत सर्व्हिस रोड आहे, परंतु पुढे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरापर्यंत सर्व्हिस रोड नाही. त्यामुळे भाविकांना अनधिकृत कट मारून जावे लागते.
सिद्धेश्वर वडगाव गावापासून मंदिर अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. येथे उड्डाणपूल आहे, परंतु त्याखालून मोठे टिपर, कंटेनर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वाहने उलट दिशेने येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या अपघातामुळे सर्व्हिस रोडच्या अभावाची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
तुमचा आवाज आम्ही बनू! धाराशिव लाइव्ह – तुमच्यासाठी!