मुंबई – मराठी व हिंदी भाषेतील प्रथितयश लेखिका, कवियत्री सुनीता झाडे ह्यांच्या ‘शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या’ या मराठी आणि ‘द सेकंड सोच’ या हिंदी कवितासंग्रहांचे लोकार्पण नित्या आर्टिस्ट सेंटर प्रभादेवी, मुंबई येथे शनिवार, दि. २८ रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार असून या संग्रहांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सुनीता झाडे ह्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहांवर प्रसिद्ध कवी, भाषांतरकार तथा संपादक गणेश विसपुते, ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार, दिल्ली येथील ख्यातनाम लेखक, समीक्षक डॉ. सुनीता, ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक रमन मिश्र भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमाला ‘अनारकली ऑफ आराह’ आणि ‘शी’ या सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश दास, ‘मुरांबा’ व ‘अस्तित्व’ अभिनित नाट्यसिनेकलावंत चिन्मयी सुमीत, ‘मालामाल विकली’, ‘भूलभुलैया’ या सिनेमाच्या पटकथालेखक मनीषा कोरडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हे कलावंत दोन्ही संग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत.
सुनीता झाडे यांचे कॉमनवुमन, आत्मनग्न हे कवितासंग्रह, रसिया हा ललितबंध प्रसिद्ध असून अनेक राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचा ‘रसिया’ ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेल अॅपवर उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ कवी, लेखक, चित्रकार मीनाक्षी पाटील तर सुत्रसंचालन प्रयोगक्षम रंगकर्मी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मंगेश बनसोड करणार आहेत. साहित्यप्रेमींनी या प्रकाशन समारोहाला उपस्थित राहण्याचे आवाहन हस्ताक्षर प्रकाशनचे विनायक येवले (नांदेड), वनिका पब्लिकेशनचे नीरज शर्मा (दिल्ली), प्रकाशचित्रकार संगीता महाजन, श्रावणी सुनीतादेव यांनी केले आहे.