धाराशिव : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महाविकास आघाडीने आपलं “ताशेरेबाजीचं” काम पूर्ण केलंय आणि आमदार कैलास पाटील यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून AB फॉर्म मिळालाय. दुसरीकडे महायुतीचं अजूनही ‘मंथन’ सुरू आहे, पण त्यातून बाहेर काय निघणार याचा अद्याप पत्ता नाही. धागा हातात आहे, पण सुटका नाही!
शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष धाराशिवच्या जागेसाठी “आग्रही” आहेत. ह्यांना जागा कधी सुटणार, कोणाला मिळणार, आणि शेवटी निवडणूक कोण लढवणार हे देवही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे!
यात अजून एक ट्विस्ट आहे! राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी आज पत्रकार परिषदेत “आयात” उमेदवार दिल्यास प्रचारच नाही, असं ठणकावलंय. प्रचारच नाही म्हटल्यावर, उमेदवार लढणार का खेळायला येणार, हे मात्र काळे यांनी सांगितलेलं नाही. ह्यामुळे धाराशिवकरांना अजून एक कोडं मिळालंय.
धाराशिवचे एक माजी नगराध्यक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भेटले, हे ऐकून कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता जर जागा मिळाली तर ह्याच ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी मिळणार असं म्हणे! पण धाराशिवचे कार्यकर्ते आणि मतदार हे ‘आयात’ माल स्वीकारणार का, की ‘स्वदेशी’ हवीय? ह्याचं उत्तर मात्र सध्या कोणाकडेच नाही!
महायुतीचे उमेदवार ठरले की अजून काही गमतीजमती येतीलच, पण आत्ता तरी धाराशिवच्या राजकीय नाट्याचा थरार उत्कंठावर्धक आहे!