तुळजापूर पोलीस स्टेशनमधील एका बिट मार्शलने (बक्कल नंबर १७१७) रात्रीच्या अंधारात एक अनोखी वसुली सुरू केली आहे. पोलीस खात्याचा नियम सांगतो की, कॉल आला तरच पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचावे लागते. मात्र, या नियमाचा धुव्वा उडवत आमचे बिट मार्शल नेहमी तुळजापूर-नळदुर्ग रोडवरील एका पुलावर बसून ‘अर्थपूर्ण’ सेवा देत आहेत.
त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं, तर पुलावर पार्क केलेली जीप! ही जीप काही साधीसुधी नाही. तिचा नंबर एमएच २५, ए ५३५१ असाच कायम राहतो. सहा महिन्यांपूर्वी एक अज्ञात वाहनाने या जीपला मागून जोरदार धडक दिली, पण त्याने काही फरक पडला नाही. जीपचं नुकसान झालं असेल, पण बिट मार्शलच्या वसुलीचा धंदा मात्र अक्षरशः जोरात सुरू आहे.
रात्रीच्या अंधारात सोलापूर, लातूर, नळदुर्गकडे जाणारी वाहने या पुलावर आली की, बिट मार्शलच्या ‘विशेष’ पथकाने वाहनं अडवणं सुरू होतं. त्यांच्या सोबत असलेले तरुण गाड्यांना अडवतात, आणि कागदपत्रांची विचारणा होते. आता कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळली तर संपलंच! यातून थोडंफार देणं-घेणं हे जवळजवळ ठरलेलंच आहे. चिरीमिरी उकळण्यासाठी तरुणांचा हा चमू प्रचंड ‘तत्पर’ आहे.
विशेष म्हणजे, जर त्यांना एखादी गोमांसाची गाडी सापडली तर मात्र मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. कायद्याचा धाक दाखवून, वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. आता असा विचार करावा लागेल की, या बिट मार्शलला नेमकं कुणाचं संरक्षण किंवा आशीर्वाद मिळालंय?
स्थानिक रहिवाशांमध्ये याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या बिट मार्शलची वसुलीची कला इतकी कौशल्यपूर्ण आहे की, पुलावरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाने त्यांच्या पथकाच्या ‘सत्काराला’ सामोरे न जाता पुढे जाणं अशक्यच आहे. जीपला लागलेली धडक असो वा परिस्थिती काहीही असो, बिट मार्शलचे ‘धंदे’ कायम चालूच राहतात.
आता ही वसुली नेमकी कधी थांबणार आणि या बिट मार्शलला हटकणार तरी कोण? पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी या सगळ्यावर काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.