तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव म्हणजे भाविकांसाठी मोठा उत्सव असतो, पण यावेळी वरुणराजाने भाविकांसोबत आपल्या जलधारांचा प्रसादही वाटायला घेतला. उद्या घटस्थापनेच्या तयारीत असलेल्या तुळजापुरात आज लाखो भाविक दाखल झाले, तेव्हा सगळीकडे “आई राजा उदो उदो” चे जयघोष सुरु होते. पण वरुणराजाने मात्र “आलो का?” असा जोरदार सवाल केला आणि त्याच क्षणी विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाने संपूर्ण शहराची दाणादाण उडवली.
आता पावसाने थोडं कमी करावं असं कोण म्हणेल? दोन तास तुफान पाऊस झाला आणि त्यानंतर हलकासा रिपरिप सुरूच होती. त्यामुळे तुळजापुरातील रस्त्यांना पाण्याचं नवं स्वरूप मिळालं – तळ्याचं! पाय ठेवायला जागा नव्हती, पण घाण आणि कचऱ्याने मात्र थेट आई तुळजाभवानीच्या दारात मुक्काम ठोकला. त्यातच गटारींची दाटी आणि विकासकामांचा गोंधळ लक्षात आल्यावर, भाविकांचा भक्तीरस तर भरला होताच, पण दुकानदारांचा ताण मात्र पाण्यात भिजला!
श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकारने लाखो रुपयांचा निधी दिला होता, पण तो विकास अजून ३ डी व्हिडीओमध्येच फिरतोय, असं म्हणतात. प्रत्यक्षात मात्र तुळजापुरात कुठे लपला, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनुदानाचं पाणी सुद्धा पावसाच्या पाण्यात वाहून गेलं असं वाटतंय.
असो, नवरात्रात आई तुळजाभवानी सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारच आहे, पण वरुणराजाने दाखल केलेला हा ‘पाहुणचार’ काहीसा जास्तच झाला असं मात्र भाविकांचं मत आहे!