उमरगा | कसगी : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एकजुटीच्या बळावर शेती अधिक फायदेशीर करण्याचा आदर्श प्रयोग उमरगा तालुक्यातील कसगी येथे साकारला आहे. येथील ‘श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटा’ने गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा मार्ग दाखवला आहे.
पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणाचा लाभ गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने श्री. माणिक शंकर सुंटनुरे यांनी शिवारातील शेतकऱ्यांना एकत्र आणून या गटाची स्थापना केली. गटाच्या नियमांचे काटेकोर पालन, शिस्तबद्ध नियोजन आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर या गटाने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एकट्याने शेती करताना येणारा वाढता उत्पादन खर्च, बियाणे व खतांची टंचाई तसेच बाजारातील भावाची अनिश्चितता यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित शेतीचा मार्ग स्वीकारला. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि सदस्यांची मेहनत यामुळे कसगी शिवारात गटशेतीचे यशस्वी मॉडेल उभे राहिले आहे.
सामूहिक खरेदी-विक्रीमुळे खर्चात बचत
गटातील शेतकरी खते, बियाणे आणि कीटकनाशकांची सामूहिक पद्धतीने ठोक खरेदी करतात. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. तसेच उत्पादित माल थेट बाजारपेठेत अथवा प्रक्रिया उद्योगांना विकण्यावर भर दिला जात असल्याने मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व मिनी स्प्रिंकलरसारख्या जलव्यवस्थापन पद्धतींचा वापर केला जात आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, सोलर ट्रॅप यांसह जीवामृत, दशपर्णी अर्क आणि निमास्त्राचा वापर केला जात आहे.
नवीन वाण, आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि बदलत्या पिक पद्धतींचा स्वीकार करून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये कुटुंबासारखी एकजूट
या गटाचे वैशिष्ट्य केवळ सामूहिक शेतीपुरते मर्यादित नाही. गटातील शेतकरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असून, एक एकर जमीन असलेला शेतकरी सहा एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातही तितक्याच आपुलकीने काम करतो. त्यामुळे गटामध्ये कुटुंबासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
गटाने सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम, आनंद रस्ता दुरुस्ती, सार्वजनिक पाणीपातळी मोजणे, पावसाची नोंद ठेवणे तसेच शिवारातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी यासाठी स्वखर्चातून जलतारा निर्माण करणे, अशा विविध उपक्रमांमध्ये गटाचा सहभाग आहे.
“एकट्याने शेती करण्यापेक्षा गटाच्या माध्यमातून शेती केल्यास उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो आणि विक्रीच्या वेळी चांगला भाव मिळतो. आमच्या गटातील सर्व शेतकरी बांधवांच्या एकजुटीमुळेच आज कसगीचे नाव गटशेतीत पुढे येत आहे,” असा विश्वास गटाचे अध्यक्ष माणिक शंकर सुंटनुरे यांनी व्यक्त केला.
इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श मॉडेल
श्री रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाच्या या प्रयोगाचे तालुका कृषी अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी कौतुक केले आहे. कसगीच्या या गटशेतीच्या मॉडेलचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन गटशेतीकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती” हा संदेश देत कसगीतील रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाने सामूहिक प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्तबद्ध नियोजनातून शेती अधिक फायदेशीर करण्याचा मार्ग दाखवला आहे.





