कळंब : तालुक्यातील खामसवाडी गावात जमिनीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. सुजित शेळके (वय 21) असे मृत युवकाचे नाव असून विलास शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळके कुटुंबात काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला. गावातील काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सुजित हा आपल्या आजी-आजोबांसोबत घरात झोपला होता. त्यावेळी आरोपी विलास शेळके घरात आला. त्याने सुजितला उठवून शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढून धक्काबुक्की झाली.
याच रागातून विलास शेळके याने धारदार चाकूने सुजितच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेला सुजित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घरातील वयोवृद्धांनी आरडाओरडा करून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
मृताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विलास शेळके याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर खामसवाडी गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
-
घटनाक्रम: खामसवाडी येथील फिर्यादी मनिषा ज्ञानेश्वर शेळके (वय ४१) यांचे सासू-सासरे घरात असताना आरोपी विलास शिवाजी शेळके (वय ४८, रा. खामसवाडी) हा अचानक त्यांच्या घरात घुसला. जमिनीच्या जुन्या वादातून त्याने सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
-
तरुणाची हत्या: घरातील हा वाद आणि मारहाण सोडवण्यासाठी मनिषा यांचा २० वर्षीय मुलगा सुजित ज्ञानेश्वर शेळके हा मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेला. मात्र, रागाच्या भरात आरोपी विलास शेळके याने सुजितच्या थेट पोटात चाकूने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात सुजितचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल:
या भयंकर घटनेनंतर मनिषा शेळके यांनी १९ एप्रिल रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी आरोपी विलास शिवाजी शेळके याच्या विरोधात नवीन ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १०३(१), ११८(१), ३३३, ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एका शुल्लक कारणावरून आणि जुन्या जमिनीच्या वादातून ऐन तारुण्यातील मुलाचा बळी गेल्याने खामसवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, शिराढोण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







