कळंब – कळंब तालुक्यातील मोहा गावात दि. २७ जानेवारी रोजी संध्याकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एका गटाने दुसऱ्या गटातील संजय काळे यांना चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचताना मुलीला धक्का लागल्याच्या कारणावरून बालाजी शिंदे, अनिता शिंदे, बबलु शिंदे, बाळा काळे, आबा शिंदे, बबन शिंदे, सागर शिंदे, लाला शिंदे, अरुण शिंदे, रवि शिंदे आणि इतरांनी अनिता काळे, संजय काळे, आशाबाई काळे, बालीबाई पवार आणि सुनिल पवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच संजय काळे यांना पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
दुसऱ्या घटनेत देवदेवाची वर्गणी का घेतली नाही, या कारणावरून प्रकाश काळे, सुनिल पवार, तालाबाई काळे, धनाजी शिंदे, संजय काळे, अनिता काळे, बालीबाई पवार, समिंताबाई काळे, भामाबाई काळे, ताईबाई काळे आणि इतरांनी बालाजी शिंदे, बबन काळे आणि अनिल पवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या दोन्ही घटनांप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भादंवि कलम १२७(२), १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.