धाराशिव: धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 140 कोटी रुपयांच्या निधीच्या कामाला सुरुवात होत असतानाच विरोधकांनी आंदोलनाची नौटंकी सुरू केली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. त्यांनी विरोधकांवर घणाघात करत महाविकास आघाडीच्या या कृतीवर टीका केली आहे.
जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुयारी गटार योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचार करून कामे रखडवून ठेवली गेली. परिणामी, धाराशिव शहरातील नागरिकांना चिखल, खड्डे, अपघात आणि वाहनांच्या नुकसानीचा सामना करावा लागला. या त्रासामुळे एका तरुण उद्योजकाचा मृत्यू देखील झाला होता.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शिवसेनेने या समस्येची गंभीर दखल घेतली. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. त्यानुसार, 140 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामाला सुरुवात झाली. मात्र, आता विरोधक या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप साळुंके यांनी केला.
“भुयारी गटार योजना गरजेची होती का? ती आणण्याचा निर्णय योग्य होता का?” या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी द्यावीत, अशी मागणीही साळुंके यांनी केली आहे. धाराशिवकर जनता या आंदोलनाची नौटंकी ओळखून त्याला पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.