धाराशिव: शाहूनगर येथील शाहुराज चौक ते स्वामी समर्थ मंदिर रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकशाही आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये ३० लाख रुपये खर्च करून हा सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, केवळ पाच महिन्यांतच रस्त्याची दुरावस्था झाली असून, त्यातून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे नागरिकांना कर्करोग आणि फुफ्फुसाचे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. चे. श्री. साई मजूर सहकारी संस्था यांनी हे काम केले असून, त्यांनी बोगस काम करून अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Video
याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांवर गुन्हा दाखल करून रस्ता पुन्हा बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, या मागणीसाठी लवकरच भूक उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.