धाराशिव – महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील जवळपास १ लक्ष ७३ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोट्यवधी अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी पात्र अर्जदार महिलांना रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी ही आर्थिक भेट मिळणार आहे.
३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३ हजार रुपये या टप्प्यात मिळतील. ३१ जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना दुसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये आणि वर्षाला १८ हजार रुपये पात्र महिलांना मिळणार आहेत.