धाराशिव: मुंबईजवळील बदलापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज महाविकास आघाडी आणि विविध संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह परिचारिका आणि अनेक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
मोर्चातील नागरिक आणि नेत्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यास राज्य सरकारच्या अपयशाला जबाबदार धरत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. मोर्चादरम्यान, “गृहमंत्री खुर्ची खाली करा” अशा घोषणा देण्यात आल्या.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थांबला. तिथे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, या गंभीर घटनेत दोषी असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला.
मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या संतप्त भावनांचा आविष्कार करत, “लाडक्या बहिणींना पैसे नको, सन्मान आणि सुरक्षा द्या” अशी मागणी केली. या मोर्चात उपस्थित नागरिकांनी राज्य सरकारच्या अपयशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि भविष्यामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेत एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी तब्बल 12 तास गुन्हा नोंद करण्यास उशीर केला. त्यामुळे जनक्षोभ उसळून सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. तेव्हा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्य कोणाचे आहे? याचा सरकारने विचार करावा. एकीकडे विरोधकांनी प्रायोजित केलेले हे आंदोलन आहे असे सांगून तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे सरकारमधील लोकांनी आतातरी राजकारण बंद करावे. लाडकी बहीण योजनेऐवजी लाडकी बहीण, लाडकी लेक सुरक्षित राहावी यासाठी सरकारने काम करणे गरजेचे आहे. अशा घटना रोखण्यात गृहमंत्री आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील म्हणाले.
मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.