धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धाराशिव लाइव्हने दिलेल्या वृत्ताला अखेर दुजोरा मिळाला असून, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
तुळजापूरचे विद्यमान राणा जगजितसिंह पाटील (भाजप ) यांच्यासमोर धीरज पाटील हे कडवे आव्हान उभे करणार का ? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
माजी आमदार मधुकराव चव्हाण यांचा पत्ता कट
तुळजापूर मतदारसंघातून माजी आमदार मधुकराव चव्हाण यांचा उमेदवारीचा दावा होता, परंतु काँग्रेसने त्यांचा पत्ता कट करून ऍड. धीरज पाटील यांना संधी दिली आहे. अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि या निवडणुकीत इच्छुक असलेल्या चव्हाण यांना उमेदवारी न मिळाल्याने ते बंडखोरी करणार की शांत राहून काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीत परंडा वाद पेटला
धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये परंडा मतदारसंघावरून मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा ) या दोन्ही पक्षांचे नेते परंडा मतदारसंघाच्या उमेदवारीवर एकमत होऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे येत्या काळात या वादाचा राजकीय परिणाम दिसून येऊ शकतो.
उमेदवारीनंतर राजकीय समीकरणे बदलणार?
काँग्रेसने तुळजापूरमध्ये ऍड. धीरज पाटील यांना संधी दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. माजी आमदार मधुकराव चव्हाण यांचे समर्थक आणि त्यांची माघार घेण्याची भूमिका यामुळे काँग्रेसचे स्थान अधिक मजबूत होणार की यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून येणार, यावरून जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात.
राष्ट्रवादीचे नेते जे मुंबईत उद्योगधंदे करतात ते अशोक जगदाळे हे गेले काही दिवस तुळजापूर तालुक्यात विविध कार्यक्रम घेऊन, मोठी हवा तयार केली होती तुळजापूरची जागा काँग्रेसला कन्फर्म झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचीदेखील तयारी दर्शवली होती. भाऊंनी दिल्लीपर्यंत फिल्डींग लावल्याची चर्चा होती. पण लातूरचे अमित देशमुख यांनी ऍड.धीरज पाटील यांना आशीर्वाद दिल्याने भाऊंचा पत्ता शेवटी कट झाला.