धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील २२ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी राज्यभरात खळबळ उडवणारी मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणातील १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीजप्रक्रिया औषधे आणि इतर कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले होते. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सुमारे १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र चौकशीदरम्यान घोटाळ्याची व्याप्ती वाढत जाऊन ती २२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले.
या प्रकरणाची तक्रार १२ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे दाखल झाली होती. त्यानंतर विविध स्तरावर चौकशी सुरू झाली. या चौकशीत गंभीर त्रुटी आणि कथित अनियमितता समोर आल्याने अखेर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या घोटाळ्याचा मुद्दा शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार कैलास पाटील यांनी सातत्याने लावून धरला होता. २ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हा विषय उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतरच या प्रकरणाला गती मिळाल्याचे मानले जात आहे.
या कारवाईमुळे राज्यातील कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा शासनाचा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेल्याचे मानले जात आहे.




