धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोऱ्या, दरोडे, महिलांवरील हल्ले, वाहन चोरी आणि खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे.
भर दिवसा महिलांचे दागिने पळवण्याचे प्रकार वाढले असून, वाहन चोरीचे प्रमाणही वाढले आहे. पोलिसांच्या वचक संपल्याने हाणामार्या, खुनाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात वाशी तालुक्यात एकाच दिवशी तीन खून झाले. धाराशिव शहरात चाकू खुपसल्याने एकाचा मृत्यू झाला. कौडगाव तांडा येथील एमआयडीसी परिसरात काल सायंकाळी एका वादातून एअरगनने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा थंड पडली असून, माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वशिल्याने आलेले वासुदेव मोरे यांना केवळ पदावर ठेवण्यात आले आहे. सर्व कारभार गणेश कानगुडे पहात आहेत, पण कानगुडे यांचे गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी वसुलीवर जास्त लक्ष आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत काही निष्क्रिय पोलिसांची वशिल्याने भरती करण्यात आली असून, काही जागा अजूनही रिक्त आहेत. त्या केव्हा भरणार याकडे लक्ष वेधले आहे.
या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.