धाराशिव-बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या टीपेश्वर अभयारण्यातील वाघोबाने सध्या वन विभागाला अक्षरशः पळवून लावले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेलगत जंगल सफारीचा आनंद घेताना वाघोबाने अनेक शिकार करून आपली दहशत पसरवली आहे. वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या वनखात्याने एक तगडी टीम पाठवली होती, पण त्यांनी “आम्हाला झेपणार नाही” म्हणत परतीची वाट धरली, आणि वाघ अजूनही ‘स्वतंत्र’ आहे.
ताडोबाच्या टीमचा ‘वन डे टूर’
ताडोबामधून आलेल्या स्पेशल रेस्क्यू टीमने धाराशिवजवळ रामलिंग परिसरात आठ दिवसांचा तळ ठोकला. या आठ दिवसांत त्यांनी वाघ शोधण्याच्या नावाखाली जंगल सफरीचा पुरेपूर आनंद घेतला, पण वाघाचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी, वाघाला ‘आझाद’ घोषित करत त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अपयशामुळे स्थानिकांना आता हा प्रश्न पडला आहे की वाघ पकडण्यासाठी आलेली टीम खरोखर वाघ शोधत होती की ‘वन ट्रीप’ साजरी करत होती?
वाघोबाचा वावर: वडजी परिसरात ‘सुट्टी’
ताडोबाच्या टीमला निरोप दिल्यानंतर पुण्यातून नवी टीम बोलावण्यात आली आहे. वाघोबाने आता आपला मोर्चा वाशी तालुक्यातील वडजी परिसराकडे वळवल्याची माहिती मिळत आहे. यमाई तलाव परिसरातील घनदाट जंगल आणि मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाघोबाला येथे निवांतपणा लाभला आहे. स्थानिक लोकांमध्ये चर्चा आहे की वाघोबाने आता वडजीला ‘पर्मनंट अड्डा’ बनवण्याचा विचार केला आहे.
वन अधिकाऱ्यांचा ‘गुन्हेगार’ वागणूक
या सगळ्यात खरा गोंधळ उडाला तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे. येडशीचे आरएफओ मुंडे साहेबांना वाघोबाच्या लोकेशनबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा त्यांनी गुन्हेगारी मालिका पाहणाऱ्या पात्रासारखा सस्पेन्स ठेवत “लोकेशन सांगता येणार नाही,” असं उत्तर दिलं. वाघ पकडण्याऐवजी ते जणू अट्टल गुन्हेगाराचा शोध घेत असल्याचा भास झाला.
जेव्हा पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला, तेव्हा मुंडे साहेब म्हणाले, “राज्याचे वरिष्ठ अधिकारी लवकरच धाराशिव व बार्शीला भेट देणार आहेत. ते आल्यावर मी तुम्हाला अपडेट देतो.” आता या अधिकाऱ्यांच्या व्हिजिटची वाट पाहायची की वाघोबाच्या पुढच्या मूव्हची, हे ठरवणं अवघड झालं आहे.
वाघ पकडणार की ‘सोडणार’?
स्थानिक लोकांमध्ये वाघ पकडण्याच्या मोहिमेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. वन विभागाला यश मिळणार का, की पुन्हा वाघोबा मोकळा राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मोहिमेत नक्की काय होतंय, हे जंगलात दडलेल्या वाघालाच माहीत असावं असं वाटतंय.
तोपर्यंत धाराशिव-बार्शीच्या सीमांवर वाघोबाची जंगल सफारी आणि वन अधिकाऱ्यांची थरारक मोहीम पाहण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. “वाघ पकडणार की पुन्हा तोच जंगलाचा राजा राहणार?” हा प्रश्न अनुत्तरितच आहे!