धाराशिव जिल्ह्याच्या जंगलात सध्या एका ‘सुपरस्टार वाघा’चा थरार चालू आहे! यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून बेपत्ता झालेला टी-22 वाघ धाराशिवच्या जंगलात आढळला, पण पकडणे? ते वन विभागासाठी लंगडी खेळण्यासारखं झालंय!
ताडोबा टीमचा “साखरझोप” मोड!
ताडोबाच्या जंगलात वाघ बघणारी, फोटो काढणारी आणि सफारीचा आनंद लुटणारी टीम धाराशिवला आली खरी, पण या वाघाने त्यांना ‘सांगकाम्याचा खेळ’ शिकवला. ५० जणांची चमू, डॉ. रवींद्र खोब्रागडे यांच्या नेतृत्त्वाखाली, सात दिवस जंगलात फिरत राहिली. वाघ दिसणं तर दूरच, त्याच्या पावलांचे ठसेही या ‘सुपर-टीमला’ सापडले नाहीत. शेवटी दमलेल्या टीमला “बॅक टू ताडोबा” म्हणत परत पाठवण्यात आलं!
धाराशिवच्या वाघाचा “व्हॉट्सॲप स्टेटस”
सोमवारी सायंकाळी धाराशिवच्या वडजी गावात वाघाने एका गायीवर हल्ला करून वन विभागाला संदेश दिला – “मी इथेच आहे. तुम्हीच आता ताडोबा परत जा!” वाघाचा हा आत्मविश्वास वन विभागाला जास्तच बोचणारा ठरला.
पुणे टीमचा “धावता शो”!
ताडोबाच्या टीमला अपयश आल्यानंतर आता पुण्याच्या वन्यजीव तज्ज्ञांची टीम या ‘टी-22 सुपरस्टार’ला पकडण्यासाठी धाराशिवमध्ये दाखल झाली आहे. पण या वाघाने आतापर्यंत “Catch me if you can” चा खेळ सुरू ठेवलाय.
वाघाचे धाराशिव प्रेम
धाराशिवच्या वाघाने जणू जिल्ह्याला स्वतःची ओळख मिळवून दिलीय. ताडोबाच्या जंगलापेक्षा धाराशिव जास्त छान, हे तो वन विभागाला दाखवून देतोय का? की धाराशिवमध्ये वन विभागाचे “फॅन क्लब” सुरू झालेत?
सर्वसामान्यांची भीती, वाघाची मस्ती!
एका बाजूला धाराशिवचे शेतकरी धास्तावले आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाघाची मस्ती सुरू आहे. आता पुण्याची टीम या वाघाला पकडते का? की आणखी एका “परतीच्या प्रवासाला” सामोरे जावे लागते? याची उत्सुकता सर्वत्र आहे.
धाराशिवच्या जंगलात “टी-22 सुपरस्टार वाघ” धुमाकूळ घालत असताना, वाघाने फक्त धाराशिवचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय!