धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून मिळणाऱ्या बातम्या आणि त्यातल्या चुका म्हणजे रोजचा मसाला झाला आहे. विशेषत: क्राईमच्या घटनांमध्ये पोलिसांची प्रेस नोट येईपर्यंत बातमीचा विषय जुना होतो, आणि लोकांच्या शिव्या मात्र ताज्या होतात! आता तुम्हाला एक ताजं उदाहरण देतो.
कळंब पोलिसांनी एक अपघाताची बातमी पाठवली. त्यांच्या माहितीनुसार, १७ वर्षांची निदा महेबुब शेख या रस्त्यावरून जात होत्या, आणि ओमनी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. निदाचा मृत्यू झाला, अशी माहिती पत्रकारांना मिळाली. पत्रकारांनी बातमी वेबसाईटवर टाकली आणि लोकांनी लगेच प्रतिक्रिया दिल्या.
पण थांबा, खरी गम्मत इथेच सुरू होते! निदा शेखचं वय खरं म्हणजे १७ महिने होतं, पण पोलिसांनी आपल्या प्रेस नोटमध्ये त्या १७ वर्षांच्या दाखवल्या. पत्रकारांच्या वेगाने बातमी प्रसिद्ध केली, पण ही चूक चुकवायला जमलं नाही. लोकांनी मग काय, शिव्या घालायला सुरुवात केली, “अहो हे काय, १७ महिन्याचं मूल एवढ्या मोठ्या गाडीच्या धडकेत कसं आलं?” अशा कमेंट्सने सोशल मीडियावर हल्लाबोल झाला.
धाराशिव पोलिसांचं तंत्रज्ञान आधुनिक झालं असलं तरी प्रेस नोट पाठवण्याची पद्धत मात्र १९८० च्या दशकात अडकलेली दिसते. काही वेळा तर अपघाताची बातमी १५-२० दिवसांनी येते, “फिर्याद उशिरा दाखल झाली,” असं कारण दिलं जातं. आणि मग पत्रकारांना जणू काही टाइम मशीनमधून घटना उचलून वर्तमानात आणायची असल्यासारखं वाटतं.
यातून एकच निष्कर्ष काढता येईल – धाराशिव पोलिसांचं काम आहे क्राईमचं समाधान करणं, आणि धाराशिवच्या पत्रकारांचं काम आहे, त्या क्राईमशी निगडीत माहितीतील चुका लोकांसमोर आणणं!
तुमचा आवाज आम्ही बनू! धाराशिव लाइव्ह – तुमच्यासाठी!